हलबा दर्पण

आज आपल्या विणकरी तसेच शेती व मजुरी करणा-या आदिवासी हलबा / हलबी समाजाची लढाई फक्त एकटा हलबा / हलबीच लढतांनी दिसत आहे. आपल्या आदिवासी समाजाची भांडण करण्याची वृत्ती तसेच एकमेकांचे पाय खेचण्याची वृत्तीमुळे आपल्याला अन्याय सहन करावा लागत आहे. आपण भुतकाळात काय चुका केल्या व कोणी केल्या याचा हिशोब करून आपण भांडण्यातच जास्त वेळ वाया घालविलेला आहे. गटबाजी व पक्षबाजी मुळे आपल्या समाजाचा मुख्य मुद्दाच लांब पडतांनी दिसतो व ज्याचा परिणाम असा झाला आहे की आपल्या समाजाचे तीन तुकडे करण्यात सरकारला यश प्राप्त झालेले आहे.

हलबा समाजात कितीतरी लोक अभ्यासु आहेत व त्यांना सत्य परिस्थिती माहित आहे परंतु आपल्याला न्याय मिळत नाही आहे किंवा त्यांचा स्वार्थी लोकांनी फक्त प्रसिध्दी मिळवण्यास उपयोग केलेला दिसते. आपल्या समाजाच्या लोकांकडे 1950 चा पुर्वीचा हलबा/हलबी चा पुरावा आहे, हलबी भाषा जिवंत आहे, आपल्या चालिरीती खेड्यापाड्यात व शहरात आजही जिवंत आहेत, पहिली अनुसुचित जमातीची जनगणना 1961 मध्ये आपल्या काही विणकरी करणा-या हलबा/हलबी लोकांना हलबा मध्ये गणण्यात आलेले आहे तरी सुध्दा आपण बोगस झालो.

आज वेगवेगळे जी.आर. काढून सरकार आपल्या लोकांवर अन्याय करतांनी दिसत आहे. काही लोकांकडे 1950 च्या पुर्वीचे पुरावे आहेत ते आपल्या न्यायसाठी कोर्टात भांडत आहे. हाय कोर्टात जिंकुनही त्यांना अधिकार न देता सरकार सुप्रीम कोर्टात अपील करत आहे. आपल्या अन्यायग्रस्त आदिवासी हलबा/हलबी समाजाचा आनंद काटोले -2011 च्या केस मध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट दिशानिर्देश दिलेले आहेत की 1950 चा पुर्वीचा पुरावा असल्यास त्याला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे परंतु सरकार सुप्रीम कोर्टाचे आदेश सुध्दा मानत नाही. आपल्या काही लोकांचे काही भागात व्यवसायाने नोंद झालेली आहे याचा उल्लेख करुन सरकार आपल्याला बोगस करत आहे तसेच हलबा / हलबी मध्ये मिक्स हलबा / हलबी प्युअर हलबा / हलबी असा प्रकार आहे व दोन्ही गटाची भाषा तसेच चालीरीती भिन्न आहेत परंतु संविधानाप्रमाणे दोंन्ही गट संविधानिक अधिकार घेण्यास पात्र आहेत मिक्स हलबा/ हलबी ला बघून आपाल्याला सांगण्यात येते की हलबा/ हलबी मध्ये विणकाम निशिद्ध आहे व अन्यायग्रस्त आदिवासी हलबा / हलबी चे जातीचे दावे फेटाळण्यात येते.

हलबा आदिवासी साठी कोष्टी ही जात नसून व्यवसाय आहे पण सरकारच्या धोरणामुळे कोष्टी ह्या व्यवसायाचे जाती दाखले घेतले तरी हलबांना अनुसूचित जमातीचे जाती दाखले मिळविण्याचे संघर्ष सुरू आहे. आपल्याला न्याय कसा मिळवता येईल तसेच आपल्या समाजाची परत फेड म्हणून समाजासाठी काही करता येईल काय या उद्देशाने हलबा दर्पण ची स्थापना झाली. हलबा दर्पण चा उद्देश स्पष्ट आहे अन्याया विरुध्द लढाई करुन न्याय मिळविणे. जर योग्य मार्गाने न्याय नाही मिळाला तर राजनीतिक लढाई लढण्याची तयारी आहे. आमचा उद्देश फक्त न्याय मिळविणे आहे,‍ प्रसिध्दी मिळविणे नाही. या सामाजिक न्यायाचा लढाईला आपल्याला ज्या पध्दतीने मदत करता येईल त्यापध्दतीने मदत करावी. सामाजिक न्यायाचा लढाईत सहभागी व्हा.