समता आणि समानतेसाठी हवे आरक्षण

समता आणि समानतेसाठी हवे आरक्षणजारो वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, बौद्धिक क्षेत्रात मागास(वंचित) असलेल्या समाजाला आरक्षण देण्यात आले. जात हा त्याचा आधार होता. सामाजिक स्थैर्य आणि संधी प्राप्त व्हावी म्हणून आरक्षण देण्यात आले. आर्थिक निकष हा आरक्षणाचा आधार नाहीच. मूलत: आरक्षण हे दोन प्रकारात मोडते. पहिले म्हणजे शैक्षणिक, नोकरी इत्यादी तर दुसरे म्हणजे राजकीय आरक्षण होय. मात्र आज जाणीवपूर्वक चुकीची माहिती लोकांपुढे मांडली जात आहे. आरक्षण सर्मथक आणि आरक्षण विरोधकांमध्ये दरी निर्माण करण्याचा हा प्रय▪आहे. विरोध करणार्‍या अनेकांना तर आरक्षणाची पार्श्‍वभूमी व घटनेतील तरतुदींची देखील माहिती नसल्याचे दिसून येते. त्यामुळे विरोध करणार्‍या मंडळींनी आरक्षणाची भूमिका समजून घ्यावी.

जाती व्यवस्थेमुळे आरक्षण अस्तित्वात आले. आरक्षणामुळे जातीव्यवस्था नाही. त्यामुळे सर्वप्रथम जाती व्यवस्था धर्मातून हद्दपार करायला हवी. असे झाल्यास आरक्षण नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. कारण आज कागदोपत्री भेदभाव संपला असला तरी मनांमध्ये तो पाळला जात आहे, हे पावलो पावली जाणवते. घटनेमध्ये अनुसूचित जाती, जनजाती तसेच इतर जाती वर्गाना शैक्षणिक, सामाजिक समतेसाठी आरक्षण देण्यासंबंधी सुचित केले गेले आहे. यात आरक्षणाची कुठेही कालर्मयादा नाही. राजकीय आरक्षणाला मात्र र्मयादा घालून देण्यात आली होती. सेवा आणि पदांमधील १0 वर्षाची अट ही विवक्षित सेवांमध्ये आंग्लभारतीय समाजाकरिता राखून ठेवण्यात आली आहे.

अनु जाती व जनजाती यांच्या शैक्षणिक-नोकर्‍यांमधील आरक्षणाला कालर्मयादा नाही. योग्य प्रमाणात सामाजिक समानता निर्माण होईपर्यंत ते चालूच राहील. स्वातंतत्र्यानंतर घटना राबवणार्‍यांनी त्याची योग्यरित्या अंमलबजावणी केली नाही. आरक्षणाची १00% अंमलबजावणी झाली असती तर २५-५0 वर्षातच आरक्षण संपुष्टात आणता आले असते. पण, मागासवर्गाचे अनुशेष न भरणे, सरकारी पदे रद्द करणे, त्यांच्यासाठी असलेला राज्य व केंद्राच्या निधीचा योग्य खर्च न होणे हे आरक्षण लांबणीमागील मुख्य कारण आहे. आरक्षण संपवायचे असेल तर पुढील १५ वर्षांत आहे त्या आरक्षणाच्या आणि मागासवर्गीय योजनांची १00% अंमलबजावणी करण्यासह १00% अनुशेष भरण्याची गरज आहे. आर्थिक निकषच लावायचा असेल तर अन्य धर्मातील सधन मंडळींनी आरक्षण नाकारून समाजापुढे आदर्श निर्माण करायला हवा. मात्र, विरोध करणारे लोक ही बाब विसरतात. आपल्या हाताचे सोडायचे नाही आणि समोरच्याला खाऊ द्यायचे नाही ही वृत्ती बाळगल्यास भारताचा कधीही विकास होणार नाही.