हलबा, ओबीसींच्या विकासासाठी आरक्षण हवेच

IMG_3561

आजवर मागास राहिलेल्या समाजाची आरक्षणामुळे काही प्रमाणात प्रगती होत आहे. तो प्रगत झाला, तर देशाची प्रगती होईल. त्यामुळे आरक्षण एकप्रकारे देशाच्या प्रगतीलाच हातभार लावते. एससी, एसटी आणि ओबीसींना आरक्षणामुळे मिळालेल्या संधीवरून हे स्पष्ट होते. डॉ. बाबासाहेबांनी आरक्षणाचे शुद्ध निकष सांगितले आहेत. आज ओबीसी समाजाची परिस्थितीही फार बिकट आहे. त्यामुळे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे.

व्यवस्थेत पिचलेल्या आणि जाणिवा मृत झालेल्या लाखो-करोडो दलितांमध्ये अस्मिता जागृत करून त्यांना माणूस म्हणून जगण्याचे बळ देण्याचे महत्त्वाचे काम आरक्षणाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांनी केले. आज देशातील आणि प्रकर्षाने महाराष्ट्रातील परिस्थितीचा विचार केल्यास येथे मोठय़ा प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत आहेत. या आत्महत्या करणार्‍यांमध्ये मुख्यत्वे या राज्यातील कुणबी समाजातील शेतकरी आहेत. शेती हा या समाजाचा मूळ व्यवसाय आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतीमधून होणार्‍या मोठय़ा नुकसानामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आज आरक्षणाचा विचार करताना या समाजाला खर्‍या अर्थाने विशेष आरक्षण देऊन पुढे आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

देशाचा विकास म्हणजे केवळ मोठमोठे रस्ते, धरण, प्रकल्प, मोठे उद्योग, विकसित शहरे इतका र्मयादित नसतो, तो व्यक्तिकेंद्रित असावा. सामान्य माणूस सर्मथपणे उभा राहणे महत्त्वाचे ठरते. आरक्षणामुळेच हे साध्य होऊ शकते. उपेक्षित घटकाला पुरेशी संधी मिळवून देण्यासाठीच आरक्षण लागू करण्यात आले. आरक्षणाचे लाभार्थी ठरलेल्या दलित, आदिवासी, ओबीसीजनांवर आरक्षण शाबूत ठेवण्याची तसेच संविधानाच्या मूल्यांची जपणूक करण्याची वेळ आली आहे. आजही आरक्षण म्हणजे काय? हे विरोध करणार्‍यांनाही कळले नाही, यामुळे आरक्षणाचा मूळ हेतू विरोधकांना समजावून सांगण्याची गरज आहे. स्वातंत्र्यापूर्वी जातीय परिस्थिती होती. तेच चित्र आजही दिसते. सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, समानता अजूनही मिळाली नाही. आरक्षणाशिवाय या देशातील जाती-जमाती आणि मागासवर्गीय समाजाला प्रगतीसाठी दुसरा पर्याय नाही. कोणताही समाज समतोल राहण्यासाठी सर्व घटकांचा विकास अपेक्षित असतो. त्यामुळे असा विकास साधण्यासाठी अद्यापही आरक्षणाची गरज आहे.