आरक्षण : शोषितांच्या कल्याणाचा मार्ग

संपूर्ण देशभरात आरक्षणाच्या मुद्यावरून रान उठविले जात आहे. मात्र, संविधान निर्मात्यांनी ज्या कारणांसाठी आरक्षणाची तरतूद केली, त्यामागची भूमिका समजून घेण्याची गरज आहे. समाजातील मागास घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. आज भौतिकदृष्ट्या विकासाचे इमले उभे राहत असले तरी दलित, शोषित समाजाची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने देशात समता प्रस्थापित करण्यासाठी आरक्षणाशिवाय पर्याय नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. आरक्षणाच्या नावावर वादविवाद करण्यापेक्षा समाजात समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी सत्ताधार्‍यांसकट सर्वांनी मिळून प्रय▪करायला पाहिजे.

आरक्षणाच्या मुद्यावरून देशात अराजक निर्माण केले जात आहे. आरक्षण रद्द करा, अशी भूमिका काही मंडळी मांडत आहे. वर्षानुवर्षे सामाजिक गुलामगिरी सहन करणार्‍या दलित, शोषित वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली. दलित, शोषित समाज हा केवळ आर्थिकदृष्ट्याच मागास होता असे नाही, तर वर्षानुवर्षे या समाजावर सामाजिक गुलामगिरी लादण्यात आली होती. पारंपरिक व्यवस्थेत समाजाच्या वाट्याला गुलामीचे जिणे आले. हीन दर्जाची कामे करवून घेण्यापासून तर अन्य प्रकारचे शोषण करण्यात आले. समाजाच्या इतर वर्गांना ज्याप्रमाणे अधिकार आणि हक्क या देशातील पारंपरिक व्यवस्थेने प्रदान केले होते, ते हक्क दलित, बहुजनांना मिळालेले नव्हते. उच्चविद्याविभूषित असणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही या व्यवस्थेने छळले होते, हा इतिहास कधीतरी आपण लक्षात घ्यायला हवा. आपल्या समाजात दलित, शोषित, बहुजन समाजाची होणारी अवहेलना संपविण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली, हे वास्तव सर्वांनी लक्षात घ्यावे.

या देशातील वंचित घटकांच्या वेदना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अस्वस्थ करीत होत्या. सबब, दलित, शोषित वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली. शिवाय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना समान हक्क मिळवून दिले. वंचित घटकांना चांगले शिक्षण मिळावे, नोकर्‍यांमध्ये संधी मिळावी यासाठी काही जागा राखीव असाव्या, अशी तरतूद करण्यात आली. अर्थात ज्या कारणासाठी आरक्षण देण्यात आले तो हेतू अद्यापही सफल झालेला नाही. राजकीय व्यवस्थेच्या उदासीन कारभारामुळे वंचित समाज आजही दैनावस्थेतच जीवन जगत आहे. आरक्षणाला विरोध करणार्‍यांनी या बाबी समजून घ्याव्या. या देशात आपल्याला सामाजिक मागासलेपण संपवून समता प्रस्थापित करायची आहे. आरक्षण हा त्याचा मार्ग आहे. मात्र, सध्याच्या काळात जाणीवपूर्वक आरक्षणावरून वाद निर्माण केला जात आहे. ठोस भूमिका घेण्याऐवजी सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. आरक्षणामुळे मागास समाजाच्या प्रगतीला हातभार लागत असून समतेच्या प्रस्थापनेचा तो मार्ग आहे. त्यामुळे आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रय▪करणे गैर आहे. असा प्रय▪झाल्यास दलित, शोषित समाज रस्त्यावर उतरेल. सबब, आरक्षणाच्या नावावर नवा वाद जन्माला घालण्याऐवजी समता, बंधुता आणि न्यायाच्या प्रस्थापनेसाठी प्रय▪करूया.